‘बिग बॉस 14’मुळे चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं आज गोव्यात निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अशात आता सोनाली यांच्या बहिणीनं खळबळजनक आरोप केला आहे. माझी बहिण सोनालीच्या जेवणात काही तरी गडबड होती, असा आरोप तिने केला आहे.
काय म्हणाली सोनाली यांची बहिणसोनाली यांची बहिण रूपेश हिने सोनाली यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा आरोप करताना ती म्हणाली, ‘माझी बहिण सोनाली हिच्याशी मी परवाच बोलले होते. ती एकदम ठणठणीत होती. पण हृदयविकाराचा झटका येण्याआधी तिचं आईबरोबर बोलणं झालं होतं. फोनवर बोलताना सोनाली थोडी अस्वस्थ होती. माझ्या जेवणात काही तरी गडबड आहे, अशी शंका तिनं आईकडे बोलून दाखवली होती. माझ्या शरिरात काही गडबड वाटत असल्याचं तिनं आईला सांगितलं होतं. काल संध्याकाळीहीी तिच्याविरोधात कुणीतरी कट रचत असल्याचं तिने आईला बोलून दाखवलं होतं. काल माझी बहिण माझ्या आईशी बोलली आणि सकाळी आम्हाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. अद्याप सोनाली यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. पोस्टमर्टम रिपोर्टमधून सोनालीच्या यांच्या मृत्यूचं खरं कारण सर्वांसमोर येणार आहे.