महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती 12’ हा रिअॅलिटी शो सध्या वादात सापडला आहे. या शोमध्ये अमिताभ यांनी विचारलेल्या एका प्रश्नावरून सोशल मीडिया ते स्थानिक पातळीपर्यंत वाद सुरु झाला आहे आणि आता याप्रकरणी बिग बी शिवाय केबीसी 12 च्या मेकर्सविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे.न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आधी लखनौमध्येही याप्रकरणी अमिताभ व केबीसी 12 च्या मेकर्सविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली होती. मनुस्मृतीबद्दल या शोमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात जातीय मतभेद निर्माण करणारा असल्याचे त्यांनी म्हटले होते. यापूवीर्ही, केबीसी 11मध्ये काही प्रश्नांवरून आक्षेप नोंदविण्यात आला होता. तेव्हा वाहिनीने यावर माफी मागितली होती.
काय आहे प्रकरणगेल्या शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी मनुस्मृतीसंदर्भात एक प्रश्न विचारला होता. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या याकार्यक्रमात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी यांनी हजेरी लावली होती.25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या? असा हा प्रश्न होता. यासाठी चार पर्याय देण्यात आले होते - अ) विष्णु पुराण इ) भगवत गीता उ) ऋग्वेद ऊ) मनुस्मृती. यानंतर स्पर्धकाने मनुस्मृतीचा पर्याय निवडला होता आणि त्याचे उत्तर बरोबर आले होते.
या प्रश्नावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. या प्रश्नामुळे हिंदू धर्मीय आणि बौद्ध धर्मीय व्यक्तींना धार्मिक आणि मानसिक आघात पोहोचला आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशात पाहण्यात आला आहे. असे प्रश्न विचारून हिंदू, धर्म, धर्मग्रंथ, धर्मनिष्ठा यांचा अपमान करून हिंदू धमीर्यांच्या भावना दुखावणे हाच उद्देश स्पष्ट होत आहे, असा आरोप अभिमन्यू पवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. इतिहासातील जखमांच्या खपल्या काढून सौहार्दपणे एकमेकांसोबत राहणाऱ्या हिंदू-बौद्ध धर्मियांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रश्न विचारण्यात आला आहे, असा दावाही पवार यांनी केला.
KBC 12 : 'मनुस्मृती'वरील प्रश्नावरून वाद; विवेक अग्निहोत्री म्हणाले, कम्युनिस्टांनी हायजॅक केलाय शो
अमिताभ बच्चन यांची ‘कोरोना’ कॉलर ट्यून ऐकून वैतागला सीआरपीएफ जवान, म्हणाला...