Join us  

"आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धा..", अश्विनी महांगडेचं नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 12:10 PM

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिनेदेखील नवरात्री निमित्त हटके फोटोशूट केले आहे.

सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. या निमित्ताने मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींनीही वेगवेगळ्या थीमवर स्पेशल फोटोशूट केले आहे. तसेच 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिनेदेखील नवरात्री निमित्त हटके फोटोशूट केले आहे. आजचा रंग हिरवा असल्याने हिरव्या रंगाच्या साडीत तिने अंधश्रद्धेचा बळी ही व्यक्तीरेखा दर्शवणारे फोटोशूट केले आहे.

अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ||#गूढ_गहिरा_अंधःकार_हिरवा_अंधश्रद्धेचा_फिटावा || आजचा रंग - #हिरवा. अभिनयाचा रस - #भयानक रस. व्यक्तिरेखा - #"अंधश्रद्धेची_बळी". कथा - #अंधश्रद्धा. आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धा. २१ व्या शतकातही अंधश्रद्धेचे भूत माणसांच्या मानगुटीवर घट्ट बसले आहे. अंधश्रध्देची अनेक उदाहरणे आहेत. काही सौम्य तर काही घातक व भयंकर आहेत. यामधलेच एक उदाहरण…

तिने पुढे लिहिले की, प्रशांत आणि ज्योतीच्या लग्नाला बरेच वर्षे होवूनही मूल होत नव्हते. प्रशांतला आजूबाजूचे, नातेवाईक सतत टोंमणे मारत होते. तो या सगळ्याला वैतागला आणि एका मांत्रिकाला भेटून त्याची अडचण सांगितली. नवरात्रीमध्ये एका मुलीचा नरबळी दिला तर तुला मूल होईल असा अघोरी उपाय सांगितल्यावर प्रशांतचा त्या मंत्रिकावर विश्वास बसला. प्रशांतने एका मुलीवर बरेच दिवस लक्ष ठेवले आणि तिचे अपहरण केले. मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या काळोख्या रात्री एका अज्ञात ठिकाणी मांत्रिक सांगेल तशी तिची पूजा करून त्या मुलीचा बळी घेतला. (सत्य घटनेवर आधारित कथा)

मागास व अशिक्षित समाजावर याचा परिणाम आहेच परंतु सुशिक्षित माणसही याला बळी पडत आहेत. #श्रध्दा आणि #अंधश्रध्दा याबद्दलचा वाद तर कायमच चालू असतो. देवधर्माशी या सगळ्याची सांगड घातली जाते. सर्वच धर्मात, कमी अधिक प्रमाणात अंधश्रध्दांचा विशेष पगडा आहे. विज्ञान आणि शिक्षणाने आपण ह्या अंधश्रध्दांचा नायनाट केला पाहिजे, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका