टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध नाव म्हणजे एकता कपूर (ekta kapoor). आजवरच्या कारकिर्दीत एकताने अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर तिचा कायमच बोलबाला असतो. एकताच्या प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यात तिच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'बडे अच्छे लगते है', यासारख्या असंख्य मालिका विशेष गाजल्या. परंतु, हिंदी कलाविश्वात दिग्दर्शिका, निर्माती म्हणून नाव कमावणारी एकता एका मराठमोळ्या अभिनेत्यामुळे या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. एका मुलाखतीत तिने स्वत: याविषयी भाष्य केलं.
हिंदी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या एकताच्या या प्रवासात लोकप्रिय मराठी अभिनेता अशोक सराफ ( ashok saraf) यांचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे एकता आणि अशोक सराफ यांच्या या मैत्रीच्या नात्याविषयी फार कमी लोकांना ठावूक आहे.
एकता कपूरने १९९५ साली 'पडोसन' या मालिकेपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. मात्र, सुरुवातीच्या काळात तिला अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे तिने दिग्दर्शन सोडून द्यावं असा सल्ला अभिनेता आणि तिचे वडील जितेंद्र कपूर यांनी दिला होता. मात्र, शेवटचा चान्स म्हणून तिने १९९५ साली विनोदी मालिका करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने १९९५ मध्ये हम पाच या विनोदी मालिकेची निर्मिती केली. विशेष म्हणजे ही मालिका त्याकाळी सुपरहिट ठरली. त्यामुळे एकताने तिच्या यशाचं सारं श्रेय अशोक सराफ यांना दिलं. एका मुलाखतीत तिने तसा उल्लेखही केला होता.
"बऱ्याचदा या मालिकेतील संवाद अत्यंत साधे होते. परंतु, आपल्या अनुभव आणि अभिनयाच्या जोरावर अशोक सराफ यांनी या संवादाचं विनोदात रुपांतर केलं. हम पांच या मालिकेला मिळालेल्या यशामुळे अनेक निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझ्या मालिकांमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली", असं एकता म्हणाली होती.दरम्यान, एकता कपूर आज टेलिव्हिजनची क्वीन आहे. बालाजी टेलिफिल्म या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ती मालिकांची निर्मिती करत असते. विशेष म्हणजे तिच्या मालिकांमध्ये ब्रेक मिळालेले किती तरी कलाकार आज रुपेरी पडद्यावर झळकत आहेत.