कॉमेडीयन कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी कपिल सज्ज झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कपिल तब्येतीच्या कारणामुळे छोट्या पडद्यापासून दूर होता. तो नैराश्याच्या गर्तेत सापडल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरूस्त झाला असून दणक्यात छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
सुपरडुपर हिट आणि रसिकांचा लाडका शो द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर तो पुनरागमन करणार आहे. याच संदर्भातील ट्विट करून कपिलनं ही आनंदाची बातमी आपल्या फॅन्ससह शेअर केली. मात्र हा शो छोट्या पडद्यावर झळकण्याआधी कपिल शर्मा देवपूजेत दंग आहे. हे पुनरागमन पहिल्याप्रमाणेच यशस्वी ठरावं यासाठी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कपिल देवीच्या चरणी लीन झाला आहे.
कपिल शनिवारी रात्री हिमाचल प्रदेशच्या बगलामुखी आणि चिंतपूर्णी मंदिरात पोहचला. यावेळी मातेच्या दरबारात कपिलने पूजाअर्चा आणि होमहवन केलं. बगलामुखी मंदिरात हवन केल्यानं सगळ्या अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाआधी कपिल देवीच्या चरणी लीन झाला. कपिल नैराश्यात असताना त्याचे मित्र कायमच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बगलामुखी देवीला साकडं घालायचे आणि तिथे होमहवन तसंच यज्ञ करायचे. कपिल देवीच्या चरणी लीन झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडणाची बरीच चर्चा झाली. हा वाद इतका गाजला आणि इतका विकोपाला गेला की, सुनीलने कपिलसोबतचे सगळे संबंध तोडले. कपिलने याऊपरही सुनीलसोबत पॅचअप करण्याचे बरेच प्रयत्न करून पाहिलेत. पण या भांडणानंतरच्या प्रत्येक मुलाखतीत सुनील कपिलबद्दल अतिशय कोरडेपणाने बोलताना दिसला. पण ताज्या बातम्यांनुसार, कपिल व सुनीलमधील नाते सुधारले आहे. याचे पुढचे पाऊल म्हणजे, कपिल व सुनीलने पुन्हा एकत्र येण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे.कपिलचा आगामी 'सन ऑफ मनजीत सिंह' हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या कपिल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे.