जवळपास दोन वर्षांनंतर सगळीकडे रंगांची उधळण होताना दिसत आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन वर्षांपासून रंगपंचमी नेहमीसारखी साजरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षी रंगांची जोरदार उधळण होणार आहे. दरम्यान मालिकांच्या सेटवर देखील रंगपंचमी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खेळण्यात आली. दरम्यान आई कुठे काय करतेच्या सेटवरदेखील होळी सण साजरा करण्यात आला. सेटवरील काही फोटो अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत ते जवळच्या व्यक्तीच्या आठवणीत भावुक झाले आहेत.
मिलिंद गवळी यांनी सेटवरील होळीचे फोटो शेअर करत लिहिले की, रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आई कुठे काय करतेच्या सेटवरची आमची होळी आणि रंगपंचमी. अनेक वर्षापासून माझं रंगपंचमी खेळणे बंद झालं, लहानपणी आम्ही डिलाईल रोड लोअर परेल दादर पोलिस कॉटर मध्ये आम्ही राहायचो, त्या भागामध्ये रंगपंचमी हा सण खूप धूमधडाक्यात खेळला जातो, मी खूपच मस्तीखोर होतो, सगळ्यांना रंग लावत फिरायचो, एकदा तर काही लोकांनी दारं उघडली नाहीत म्हणून गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीमध्ये रंग टाकले, तीन दिवस अख्या बिल्डिंगमध्ये रंगीत पाणी येत होतं, खूप बोंबा बोंब झाली, खूप फटके, खूप ओरडा पडला, पण एकदा पोरांनी ऑइल पेंट का सिल्वर कलर माझ्या चेहऱ्याला आणि केसांना लावला, दोन दिवस तो रंग जाता जाईना, तोंडाची डोळ्यांची आग व्हायला लागली, कदाचित तेव्हापासूनच रंग खेळण्या विषयी माझं मन उडालं.
मला अॅक्टर व्हायचं होतं, चेहरा, केस, आपलं दिसणं या सगळ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या,मग ठरवलं की आपला चेहरा खराब होईल असं काही करायचं नाही, कोणालाही चेहऱ्याला रंग लावू द्यायचा नाही, रंगपंचमीच्या दिवशी मी पहाटेच कुठेतरी निघून जायचो किंवा घरात स्वतःला कोंडून घ्यायचो, पण आमच्या घरामध्ये एक व्यक्ती अशी होती जी रंगपंचमीच्या दिवशी कोणालाही सोडायची नाही ,सगळ्यांनाच ती रंग लावायची, ती म्हणजे माझी आई, असे ते सांगत होते.