शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी मांडला आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यानं साकारली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी धर्मवीरची टीम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येत्या १६ आणि १७ मे रोजी येणार आहे.
विशेष म्हणजे यावेळी सिनेमाच्या टीमसोबत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदेसुद्धा येणार आहेत. हास्याच्या मंचावर हे दिग्ग्ज खळखळून हसणार आहेत. आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं.
अभिनेता प्रसाद ओक याचा 'धर्मवीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक प्रवीण तरडे यांच्या लिखाणाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्याची कारकिर्द सांगणार आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई, क्षितीश दाते आणि अभिनेत्री श्रुती मराठे हे कलाकार हास्याच्या मंचावर येणार आहेत. या चित्रपटाची सगळीकडेच खूप चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे.