‘सावधान इंडिया’ने पूर्ण केली यशाची पाच वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2017 11:41 AM
‘सावधान इंडिया’ या मालिकेने पाच वर्षे नुकतीच पूर्ण केली. या गेल्या पाच वर्षांत या मालिकेने काही वास्तव गुन्हेगारी घटना ...
‘सावधान इंडिया’ या मालिकेने पाच वर्षे नुकतीच पूर्ण केली. या गेल्या पाच वर्षांत या मालिकेने काही वास्तव गुन्हेगारी घटना आपल्या कार्यक्रमाद्वारे देशापुढे सादर केल्या आणि लक्षावधी नागरिकांना संभाव्य गुन्हेगारी घटनांपासून सावध केले.विविध प्रकारचे गुन्हे कसे घडतात आणि त्यांचा मुकाबला कसा करायचा, याबद्दल या कार्यक्रमाद्वारे कुमारवयीन प्रेक्षकांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत सर्व थरातील प्रेक्षकांचे या मालिकेने प्रबोधन केले आहे. समाजाला भेडसावणा-या समस्यांबद्दल जनजागृती करणे आणि या समस्यांचा सामान्य नागरिक कशा प्रकारे प्रतिकार करीत असतात, ते प्रेक्षकांसमोर आणून गुन्हेगारीविरोधात समाजात बदल घडवून आणण्यात प्रयत्न करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश राहिला आहे. या कार्यक्रमाचा प्रभाव इतका मोठा आहे की अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, जॉन अब्राहम, विद्या बालन, दिव्या दत्ता यासारख्या बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे.गतवर्षी या मालिकेने आपल्या कार्यक्रमांमध्ये मोठा बदल घडवून आणला आणि सामान्य नागरिकांना गुन्ह्यांविरोधात खंबीरपणे मुकाबला करण्याचे सक्रिय आवाहन आपल्या ‘डर के नहीं, डट कर!’ या नव्या घोषवाक्याने प्रेक्षकांना केले. काही दिवसांपूर्वी या मालिकेने ‘अंधविश्वास के खिलाफ’ ही नवी मालिका प्रसिध्द भोजपुरी अभिनेता रवी किशन याच्या सूत्रसंचालनाखाली सुरू केली होती. लोकांमधील अंधश्रध्दा आणि कोणावरही ठेवलेला अंधविश्वास यांच्याविरोधात लोकांना जागृत करणे हा या मालिकेचा उद्देश आहे.आता या मालिकेनेपाच वर्षे पूर्ण केल्याबद्दल सूत्रसंचालक म्हणून या मालिकेशी प्रदीर्घ काळ निगडित असलेल्यासुशांतसिंहने ‘ट्वीट’ करून आपला आनंद व्यक्त केला. यात त्याने म्हटले आहे, “‘सावधान इंडिया’बरोबर पाच वर्षं काम करण्याचा अनुभव समृध्द करणारा होता. सावधान इंडियाने लोकांना गुन्हेगारीविरोधात केवळ सजगच केलं, असं नाही,तर त्यांना गुन्ह्य़ांचा प्रतिकार करण्यास उद्युक्त केलं, हे या मालिकेचं मोठं यश मानलं पाहिजे. सध्याच्या काळातील गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता, वास्तव जीवनातील गुन्हेगारी घटना प्रेक्षकांपुढे सादर करून समाजाला सावध करण्याचं मोठं काम ही मालिका करीत आहे. या मालिकेतील प्रत्येक भागात जो विषय आम्ही मांडतो, तो माझ्या मनाला अतिशय जवळचा असतो. अशा या मालिकेशी मी यापुढेही निगडित राहीन, अशी मला आशा आहे.”