बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये 'गुलीगत धोका' या डायलॉगने प्रसिद्ध झालेला सूरज चव्हाण सहभागी आहे. सूरजने घरात पहिल्या दोन दिवसात विशेष काही खेळ दाखवला नाही. पण नंतर बिग बॉसने समजावल्यावर सूरज चव्हाण घरात सक्रीय झाला. त्याने निक्की तांबोळीलाही स्वतःची कामं स्वतः करण्यापासून सुनावलं. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सूरज चव्हाणला साफसफाईची कामं दिल्याने 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकूर वाढवेने राग व्यक्त केलाय.
अंकूरने सूरजला दिलेल्या कामावरुन व्यक्त केला राग
अंकूर वाढवेने पोस्ट करुन लिहिलंय की, "दोन्ही टाईमचे भांडे, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाही आहेत.. तरीही सूरजने का करावं? सूरज सारखा कोणीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्यांना बोलणारे ९०%) तो या शोमध्ये या सगळ्यांचंं प्रतिनिधित्व करतोय तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील कदाचित ह्यात तो अडकलाय."
बाकी लोकांना भांडी घासता येत नाही म्हणून...
अंकूर पुढे लिहितो, "बाकी लोकांना भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सुरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, सिंपथी यावर मी बोलू शकत नाही एवढी समज नाही माझी." अशाप्रकारे अंकूरने सूरज चव्हाणला जी कामं सांगितली जातात त्यावर राग व्यक्त केलाय.