Join us

ती रोज गुपचूप त्याच्या बॅगेत 50 रूपये टाकायची..., भावुक करेल कुशल बद्रिकेची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 3:09 PM

Kushal Badrike Birthday : तुम्हा आम्हाला खळखळून हसवणा-या कुशलचा आज वाढदिवस. कुशलची लव्हस्टोरी फारच भन्नाट आहे. जितकी भन्नाट तितकीच भावुकही आहे. 

ठळक मुद्देलग्नानंतर सुनयनाची नृत्याची आवड मागं पडली होती. परंतु आता ती आपली आवडत जोपासत आहे. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे.  

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत ‘चला हवा येऊ द्या’  (Chala Hawa Yeu Dya ) मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचं मनोरंजन करत आहेत. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. (Kushal Badrike) विविध स्किट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. तुम्हाआम्हाला खळखळून हसवणा-या कुशलचा आज वाढदिवस. कोल्हापुरात अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि आपल्या कष्टानं इथपर्यंत पोहोचलेल्या कुशलची लव्हस्टोरी फारच भन्नाट आहे. जितकी भन्नाट तितकीच भावुकही आहे. 

कुशल अंबरनाथच्या एका कॉलेजात शिकत असताना एका खुल्या एकपात्री स्पर्धेमध्ये त्याचं नाव जबरदस्तीनं टाकण्यात आलं.  याच स्पर्धेत एका मुलीने ‘मी फुलराणी’मधला एक पॅच सादर केलेला. त्या मुलीचा स्टेजवरचा अभिनय पाहून कुशल चांगलाच इम्प्रेस झाला होता. या स्पर्धेत कुशल पहिला आला आणि त्या मुलीला उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळाली. ती मुलगी पुढे कुशलची प्रेयसी बनून त्याच्या आयुष्यात आली.   कुशलच्या पडत्या काळात ती खंबीरपणं त्याच्या पाठीशी उभी राहिली.

 त्या काळात कुशलची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती. त्याच्याकडं पैसे नसायचे. पण रोज त्याच्या बॅगेत कोणीतरी येऊन 50-60 रूपये टाकायचे आणि गुपचूप निघून जायचे. त्या 50-60 रूपयात कुशलचा वडापाव, बसभाडं सर्वकाही व्हायचं. कुशलच्या बॅगेत पैसे टाकणारी ती दुसरी तिसरी कुणी नव्हती तर कुशलची प्रेयसी होती. तिचं नाव सुनयना.  

पुढं तिच्याचसोबत कुशलनं लग्नगाठ बांधली. आधी या लग्नाला बराच विरोध झाला. पण सुनयनानं कुशलची साथ सोडली नाही. ती ठामपणं त्याच्यासोबत उभी राहिली. अखेर सुनयनाच्या कुटुंबानंही होकार दिला आणि दोघांचं शुभमंगल झाल.  सुनयना ही कथ्थक नृत्यांगना आहे.लग्नानंतर सुनयनाची नृत्याची आवड मागं पडली होती. परंतु आता ती आपली आवडत जोपासत आहे. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे.  

टॅग्स :कुशल बद्रिके