‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. स्कीट सादर करताना स्टेजवरील त्याची एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरही तो चाहत्यांना मजेशीर पोस्ट करत मनोरंजक करत असतो. सध्या मात्र त्याच्या काहीशा गर्भित पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कुशलनं इन्स्टावर त्याचा एक ब्लॅक अॅण्ड फोटो शेअर करत चार ओळींची पोस्ट शेअर केली आहे. ‘ एखाद्या फोटो मधले रंग “burst” झाले की तो फोटो घाणेरडा दिसतो, मग त्या फोटोला black and white करायचं , तोच फोटो एकदम भारी दिसायला लागतो. आयुष्याचही तसंच आहे , black and white चालेल पण बरबाद करणारे रंग नकोत !’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय त्याचा हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट अंदाज देखील चाहत्यांना भलताच आवडलेला आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ नावाच्या विनोदी कार्यक्रमामधून कुशल प्रकाशझोतात आला. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात विविध भूमिका करत असताना त्यांच्या अनोख्या विनोद शैलीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. कुशलने मालिकांसोबतच रंपाट, बायोस्कोप, स्लॅम बुक, बकुळा नामदेव घोटाळे अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. कुशलला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वत: जितकी मेहनत घेतली तितकीत त्याच्या आईनं आणि पत्नीनं घेतल्याचंही तो सांगतो. कुशलीची पत्नी कलाकर आहे. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे. कुशल त्याच्या मुलांसोबत व पत्नीसोबतचे देखील काही भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो.