सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज लाफ्टर चॅम्पियन म्हणजे भारतीय प्रेक्षकांसाठी वीकएंडची पर्वणीच आहे! ११ जून पासून सुरू झालेला हा शो, त्यातील मजेदार कंटेन्टमुळे प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत चालला आहे. अर्चना पूरण सिंग आणि शेखर सुमन या शोमध्ये परीक्षणाचे काम करत असून या शोमध्ये दर आठवड्याला नवे नवे स्पर्धक येतात आणि उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या उमेदीने आपले धम्माल अॅक्ट सादर करतात. या व्यतिरिक्त, प्रत्येक भागात या मस्तीत भर घालायला एक प्रसिद्ध विनोदवीर सरपंच म्हणून आमंत्रित करण्यात येतो. या रविवारी सरपंच म्हणून सुरेश अलबेला हा विनोदवीर येणार आहे. या भागात इतर स्पर्धकांसोबत मुंबईची विनोदवीरांची प्रसिद्ध जोडी भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे म्हणजेच भारत-सागर या शोमध्ये स्पर्धक म्हणून येणार आहेत. भारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा अॅक्ट पाहून प्रभावित झालेली परीक्षक अर्चना पूरण सिंग म्हणाली, “तुमचा अॅक्ट तर अफलातून होताच पण त्याहीपेक्षा जबरदस्त तुमची जोडी आहे. तुम्ही दोघे एन्टरटेनर आहात आणि तुम्ही माझे चांगलेच मनोरंजन केलेत. मला खूप मजा आली.” तिच्या मताशी सहभागी होत, शेखर सुमन म्हणाला, “कधी कधी असं होतं की, तुम्ही संपूर्ण चित्रपट बघता, पण त्यातली एखादी ओळच तुमच्या लक्षात राहते. ‘जंजीर’ चित्रपट बघितल्यानंतर लोकांना अमिताभ बच्चन यांचा तो खास संवाद लक्षात राहिला होता. तुमच्या या अॅक्टमध्ये ’12 वाजता नाही’ हे वाक्य इतके जबरदस्त होते की, तुम्ही हा पूर्ण अॅक्ट केला नसता, तरी ती एकच ओळ त्याच्या खास टोनमुळे लोकप्रिय झाली असती. कधीकधी पंचलाइन खूप उत्कृष्टपणे सादर होतात आणि आज ते करून तुम्ही आमचे मन जिंकून घेतले आहे. मी तुम्हाला इतकेच सांगीन की, “गागर में सागर है, सागर में गागर है, ये तो नहीं पता लेकीन आप दोनो मिलके महासागर है!”
सागर कारंडेने देखील अशाच भावना व्यक्त करत म्हटले, “इंडियाज लाफ्टर चॅम्पियनने आम्हाला संपूर्ण देशासमोर आमची कला प्रदर्शित करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल आम्ही सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे ऋणी आहोत. आमच्या अॅक्टमधून आम्ही परीक्षक अर्चना पूरण सिंग आणि शेखर सुमन यांना प्रभावित करू शकलो. त्यांनी आमच्यासाठी उच्चारलेले शब्द हे जणू त्यांनी आम्हाला येथून पुढच्या वाटचालीसाठी दिलेला आशीर्वादच आहे. आम्हाला परफॉर्म करायला आवडते, आणि अर्चनाजी म्हणाल्या त्याप्रमाणे आम्ही एन्टरटेनर्स आहोत. म्हणतात ना की, ‘तुमच्या आवडीचे काम निवडा म्हणजे आयुष्यात तुम्हाला कधीच ‘काम’ करावे लागणार नाही’. मी आणि भारत जेव्हा प्रेक्षकांपुढे परफॉर्म करतो, तेव्हा आम्हालाही असेच वाटते.”