‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (MaharashtraChi Hasya Jatra) फेम वनिता खरातच्या लग्नातला एक रोमॅन्टिक फोटो पाहून एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. होय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर निखिल बने (Nikhil Bane) आणि ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) फेम स्नेहल शिदम (Snehal Shidam) यांच्या नात्याची चर्चा यानंतर रंगली होती. या चर्चेला कारण ठरला तो दोघांचा वनिताच्या लग्नातील एक फोटो. स्नेहलने निखिलसोबतचा वनिताच्या लग्नातला एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. 'पिरतीच्या फडात गं धरला हात असा काळीज येंधलं आरल .....'असं कॅप्शन स्नेहलने या फोटोला दिलं होतं. मग काय? निखिल व स्नेहल यांच्यात काहीतरी नक्कीच शिजतंय, असा त्याचा अर्थ काढला गेला होता. निखिल बनेने या फोटोमागची खरी कहाणी सांगितली होती. पण स्नेहल शिदम काहीच बोलली नव्हती. पण अखेर एका ताज्या मुलाखतीत ती यावर बोललीच. शिवाय त्या रोमॅन्टिक फोटोमुळे झालेला एक फायदाही तिने सांगितला.
काय म्हणाली स्नेहल?सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची क्रेझ लोकांना असते. आतापर्यंत अनुष्का शर्मा काय करते, काय घालते, याबद्दल लोकांची क्रेझ मी पाहिली होती. पण, माझा व निखीलचा तो फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्याही बद्दल लोकांच्या मनात तिच क्रेझ आहे हे बघून भारी वाटलं. खरं तर, आमच्यात तसलं काहीही नाही. मी आणि निखिल खूप सॉर्टेड आहोत, आमचं अफेयर वगैरे काहीही नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे फोन आलेत. अगदी आम्हाला सांगितलं का नाही, असं काही जण विचारत होते. पण नंतर निखिल यावर बोलला आणि आपसूक सगळं थांबलं. एक मात्र खरं हा फोटो व्हायरल झाल्यानंतर निखिलला मोठा फायदा झाला. त्याला इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळाली. आमच्या दोघांचे फॉलोअर्स पण वाढले”, असं स्नेहल हसत हसत म्हणाली.
काय म्हणाला होता निखिल?स्नेहलआधी निखिल त्या फोटोवर बोलला होता. “सध्या तरी मला त्या चर्चांवर काहीही बोलायचं नाही. एक मात्र खरं, मला सध्या जाम मजा येतेय. कारण आम्ही दोघंही सध्या ट्रेंडमध्ये आहोत. स्नेहल व मी आम्ही दोघं कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही नाटकांपासून एकत्र काम करतोय. खूप दिवसांनी भेटलो की आम्ही एकत्र फोटो काढतो. त्यादिवशी वनिताच्या लग्नात आम्ही भेटलो. चांगला कॅमेरा होता, म्हणून फोटो काढला. माझा कधी नव्हे ते त्या दिवशी आयुष्यात एक बरा फोटो आला आणि तो अपलोड केला आणि त्यावरुन इतक्या बातम्या झाल्या. इतक्या बातम्या होतील असं मला वाटलं नव्हतं. पण ठिक आहे. लोकांच्या आपण इतके मनात आहोत, याचा आनंद आहे. त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या बातम्या करा. आम्हाला काहीही हरकत नाही. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि कायम राहू”, असं निखिल म्हणाला होता.