लॉकडाऊनच्या काळात 90 च्या दशकातील अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत. अशात आता प्रेक्षकांनी ‘चंद्रकांता’ ही त्याकाळी अपार गाजलेली मालिका पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. 1994 साली दूरदर्शनवर प्रसारित ‘चंद्रकांता’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.
देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ही मालिका होती. 90 च्या दशकातील ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील क्रूरसिंग, जादुई अय्यार, पंडित जगन्नाथ आदी पात्र आजही आठवणीत आहेत. दर रविवारी सकाळी 9 वाजता या मालिकेचे प्रसारण व्हायचे. केवळ लहान मुलंच नाहीत तर मोठी माणसंही ही मालिका पाहण्यासाठी रविवारची आतुरतेने वाट पाहत असत. या मालिकेत अभिनेत्री शिखा स्वरुप चंद्रकांताच्या भूमिकेत होती. अॅक्टिंगसोबतच शिखाच्या सौंदर्यानेही प्रेक्षकांना वेड लावले होते. आज याच शिखाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
शिखााने 1988 मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. विशेष म्हणजे 1991 पर्यंत हा ताज तिच्याकडेच होता. याचे कारण म्हणजे 1989 आणि 1990 याकाळात स्पॉन्सर्स न मिळाल्याने मिस इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. त्यानंतर 1991 मध्ये प्रीती मनकोटिया हा ताज पटकावला.
अभिनेत्री, मॉडेल यासोबतच शिखा एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटूही आहे. राष्ट्रीय स्तरावर तिने बॅडमिंटन खेळले आहे.
शिखाने टीव्ही मालिकांशिवाय बॉलिवूडच्या काही सिनेमांतही काम केले. तहलका, पुलिसवाला गुंडा, पुलिस पब्लिक,नागमणि, कायदा कानून आणि़प्यार हुआ चोरी-चोरी या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. झी टीव्हीवरील रामायण या मालिकेत तिने कैकयीची भूमिका साकारली होती.
शिखा आज इंडस्ट्रीत नाही. एका गंभीर आजारामुळे तिचे करिअर संपले. आज ती ग्लॅमर इंडस्ट्रीतच काय तर सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह नाही.