झी मराठीवर ‘चंद्रविलास’ ही नवी मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेची कथा दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची आहे. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतो, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.
या मालिकेत अनंत महाजनची भूमिका साकारत असलेल्या सागर देशमुख म्हणाला, चंद्रविलास’ ही एक रहस्यमयी कथानक असलेली मालिका आहे. झी मराठी खूप दिवसांनी थरारक मालिका करत आहे. मला स्वतःला रहस्यमय गोष्टी आवडतात, त्यामुळेच मला या मालिकेत काम करतांना एक वेगळाच अनुभव येतो.
पुढे तो म्हणाला, या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर अनंत महाजन हे पात्र मी साकारत आहे. हा मुंबई मध्ये राहणारा एक आर्किटेक्ट आहे, अत्यंत विद्वान व नास्तिक स्वभावाचा माणूस असून त्याचा देवांवरती आणि भुतांवरती विश्वास नाही. त्याच त्याच्या मुलीवरती अत्यंत प्रेम आहे. कारण काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी काही कारणास्तव त्याला सोडून गेली होती, थोडक्यात तिचे निधन झाले आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतरची पोकळी भरून काढण्यासाठी तो आपल्या मुलीबद्दल अधिक काळजी घेत आहे. काही काळाने त्याला चंद्रविलास या वाड्यावर याव लागत आणि तिथे ते दोघही बाप आणि लेक अडकून पडतात.