झी युवा वाहिनीवर वेगळ्या धाटणीची 'वर्तुळ' मालिका नुकतीच दाखल झाली असून या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिकेसोबतच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसतो आहे.
विजयने 'वर्तुळ' मधील भूमिका आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेपेक्षा त्या व्यक्तिरेखासाठी केलेल्या अभिनयात समतोल राखणे खूप महत्वाचे आहे असे विजयला वाटते. आयुष्य म्हणजे सुख आणि दुःख यांचा मेळ त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेपेक्षा व्यक्तीरेखा खूप महत्वाची असते. त्यामुळे कुठलीही व्यक्तिरेखा आत्मसात करण्यासाठी तिचा अभ्यास करणे महत्वाचे असते असे विजयचे मत आहे. वर्तूळ मधील व्यक्तिरेखेसाठी विजयने त्याच्या जीवनशैलीमध्येदेखील खूप बदल केले.याबाबत विजय म्हणाला, "वर्तूळ मधील माझ्या भूमिकेसाठी मी माझ्यामध्ये काही बदल केले. मी याआधी खूप भावनिक आणि रोमांचक भूमिका केल्या आहेत आणि वर्तूळमधील भूमिका त्यापेक्षा खूपच वेगळी आहे. कुठलीही भूमिका आत्मसात करण्यासाठी मी त्या भूमिकेच्या शैलीशी संबंधित मालिका आणि चित्रपट पाहतो. मी या भूमिकेसाठी देखील अनेक चित्रपट पाहिले. बॅटमॅन चित्रपटातील जोकर ही व्यक्तिरेखा निभावणारा अभिनेता हीथ लेजर कडून मला या भूमिकेसाठी प्रेरणा मिळाली. तसेच शूटिंगच्या १५ दिवस आधीपासूनच मी माझ्या व्यक्तिरेखेप्रमाणेकपडे परिधान करून त्या भूमिकेचा रीतिवाद आत्मसात करायला सुरुवात केली. मी अजूनही ही व्यक्तिरेखा अधिकाधिक उत्तमपणे कशी सादर करता येईल याकडे भर देतो आणि मी आशा करतो की प्रेक्षक मला माझ्या कामाची पोचपावती नक्की देतील."