छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra)वर प्रेक्षक अगदी भरभरुन प्रेम करतात. या शोमधील प्रत्येक विनोदवीराने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळे काही विनोदवीरांचे नशिबच बदलले आहे. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे सर्वांचा लाडका दत्तू उर्फ दत्ता मोरे (Dutta More).
दत्तू मोरेचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. तो ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत राहतो. दत्तू राहत असलेल्या चाळीला दत्तू चाळ असे नाव देण्यात आले आहे. तीन बहिणी, आई-वडील असा दत्तूचा परिवार आहे. या सगळ्यांचा सांभाळ तोच करतो. याशिवाय आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना घरात बसून छोटी मोठी कामेही या भावंडांनी केली आहेत.
अल्ट्रा मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत दत्तूने खडतर प्रवासाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, शाळेत असताना मला नृत्य, नाटकाची आवड होती. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर कलाविश्वात काम करायचे असेल तर काय करावे हे मला तेव्हा कळले नाही. दरम्यान मी एकांकीकासाठी बॅक स्टेज काम करु लागलो. बॅक स्टेज आर्ट्ससाठी काम करत असताना एकांकीकेमध्ये छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. तिथून माझा हा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.