चेतन चिटणीस आणि स्नेहा चव्हाण प्रेम हेमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2017 5:03 AM
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाची एक खास जागा असते. एकतर्फी प्रेमाची आठवण तर वेगळीच असते. एकतर्फी प्रेम आयुष्यात कधीच व्यक्त ...
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाची एक खास जागा असते. एकतर्फी प्रेमाची आठवण तर वेगळीच असते. एकतर्फी प्रेम आयुष्यात कधीच व्यक्त केले जात नाही. ते नेहमीच मनाच्या एका कप्प्यात बंदिस्त राहाते. आपण ज्याच्यावर अनेक वर्षं प्रेम केले आहे, पण त्याला सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही अशी व्यक्ती अनेक वर्षांनी समोर आल्यावर काय घडते. अशाच एका जोडप्याची कथा प्रेम हेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आयुष्यातील एक वळण संपल्यानंतर अनेक वर्षांनी ते दोघे पुन्हा एकमेकांसमोर येतात आणि मग त्यांच्या आयुष्यात काय घडते हे या मालिकेत दाखवले जाणार आहे. ऑब्जेक्शन माय लव्ह असे या भागाचे नाव असून स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.दोन तरुण वकील प्रिया आणि निखिल यांच्या आयुष्यातील पहिलीच केस. दोघेही आपल्या आपल्या अशीलांसोबत केवळ विजयच मिळवायचा या इराद्याने कोर्टरूममध्ये येतात. पण एकमेकांच्या समोर आल्यानंतर आपण एकमेकांचे कॉलेज फ्रेंड्स असल्याचे त्यांच्या लक्षात येते आणि त्यातही निखिलचे प्रिया हे पहिले प्रेम आहे. त्यानंतर काय गमतीजमती घडतात हेच ऑब्जेक्शन माय लव्हमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. यात विजय गोखले जजच्या भूमिकेत आहेत. केस सुरू झाल्यानंतर या दोघांमधील प्रेमसुद्धा बहरत जाते. पण व्यवसायिक आयुष्य वैयक्तिक आयुष्याच्या मध्ये येते का? किंवा प्रेमाचा त्यांच्या व्यवसायिक आयुष्यावर काही परिणाम होतो का? प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानानंतर प्रेम हे आयुष्यभर नेहमी तसेच राहते की वैयक्तिक अहंकार प्रेमावर भारी पडतो. अशा या सर्व भावभावनांनी गुंफलेली एक गमतीदार कथा म्हणजे ऑब्जेक्शन माय लव्ह आहे. यात चेतन आणि स्नेहासोबतच सुरेंद्र केतकर, मंजुषा जोशी, श्रीरंग दाते यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर स्वप्नील गांगुर्डेने ही कथा लिहिली आहे. या गोष्टीचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे यांचे आहे.