Join us

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून उलगडणार सर्जिकल स्ट्राइकचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 5:21 PM

मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गनिमी काव्याचा वापर करत अनेक सर्जिकल स्ट्राइक घडवून आणले होते.

इतिहासाच्या पानांत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या काही अशा युद्धनीतींचा उल्लेख आहे त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दिले. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गनिमी काव्याचा वापर करत अनेक सर्जिकल स्ट्राइक घडवून आणले होते. पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानावर शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेला हल्ला हा अतिशय अचाट कौटिल्यपूर्ण असाच होता. लालमहालात शिरून शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच..! हाच सगळा थरार सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या विशेष भागातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

शाहिस्तेखानाच्या धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्याची योजना पक्की केली. शिवाजी महाराज लालमहालात अतिशय शिताफीने शिरले. शाहिस्तेखानाची धांदल उडवून दिली. या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाला याचा मोठा हादरा बसला.

लढाईच्या वेळी सैन्याच्या अग्रस्थानी राहण्याचे धाडस दाखवत धोका पत्करणारे छत्रपती शिवाजी महाराज उत्तम सेनापती होते त्याची प्रचीती, तसेच रमजान महिन्याचा मुहूर्त साधत या हल्ल्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी आखली? याचा थरार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अप्रतिम अभिनयातून या मालिकेत अनुभवायला मिळणार आहे. या विशेष भागाच्या चित्रीकरणादरम्यान डॉ. अमोल कोल्हे हे दुखापतग्रस्त झाले. सुप्रसिद्ध 'स्टंट मास्टर' रवी दिवाण यांनी या विशेष भागाची साहस दृश्ये साकारली आहेत.

 कमीतकमी वेळात प्रतिपक्षाची अधिकाधिक हानी हे महारांजांच्या गनिमी काव्याचे तंत्र होते. धैर्य आणि युक्ती याचा सुयोग्य वापर करीत युद्धनेतृत्व करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य होते. याची झलक दाखवणारे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतील हा विशेष भाग रसिकांना अनुभवता येणार आहे.