झी मराठी वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. ह्या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत. वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे.
तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे.
आता ह्या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे कारण ३६ गुणी जोडी मध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे, त्यांच नाव आहे 'पुरुषोत्तम गुडपल्लीवार' आणि ही व्यक्तिरेखा साकारत आहेत जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे. मिलिंद शिंदेने तू तिथे मी, वादळवाट, अग्निहोत्र, गंध फुलांचा गेला सोडूनी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता मिलिंद शिंदे आता ३६ गुणी जोडी मालिकेत झळकणार असून त्यांच्या प्रवेशानंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. मिलिंद शिंदे साकारत असलेले हे पुरुषोत्तम गुडपल्लीवार नेमके कोण? आणि ह्यांच्या येण्याने ३६ गुणी जोडीचा वाद भडकणार की मिटणार? हे आपल्याला येत्या आठवड्यात कळणार आहे.