बालपण देगा देवामध्ये अण्णांना या कारणामुळे सतवतेय आनंदीची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2017 7:07 AM
बालपण देगा देवा मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेमध्ये अण्णा ही व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले साकारत ...
बालपण देगा देवा मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेमध्ये अण्णा ही व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले साकारत आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचसोबत या मालिकेतील आनंदीचे म्हणजेच मैथिलीचे निरागस अभिनयासाठी चांगलेच कौतुक होत आहे. वेगळ्या धाटणीची संकल्पना प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळत आहे. आनंदीचे निरागस प्रश्न, तिची हुशारी मालिकेतील अनेक प्रश्न सोडवेल आणि प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडेल यात काहीच शंका नाही. आता प्रेक्षकांना या मालिकेमध्ये दशावतार बघायला मिळणार आहे. या विशेष भागामध्ये आनंदी देवी बनणार आहे आणि त्यानंतर पुढे काय होणार हे पाहाणे रंजक असणार आहे.मालिकेत गावामध्ये एक उत्सव साजरा होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मदन गावातील लहान मुलांचे नाटक बसवणार आहे. तो यात सूत्रधाराची भूमिका वठवणार आहे. या नाटकात देवीची भूमिका साकारण्यासाठी शारदा आनंदीचे नाव सुचवणार आहे आणि तीदेखील देवी बनण्यास तयार होणार आहे. आनंदी नाटकामध्ये देवीची भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक असणार आहे. अण्णा गावामध्ये नसल्याकारणाने आनंदी त्यांना फोन करून तुम्ही नाटक बघायला या असे देखील सांगणार आहे. नाटकात देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर तिथे जमलेले गावकरी देवीची म्हणजेच आनंदीची आरती करणार आहेत. पण त्याचवेळी अण्णा तिथे येणार आहेत. नाटकात आनंदीने चांगली भूमिका साकारल्याने गावकरी तिचे कौतुक करणार आहेत, तिला शाबासकी देणार आहेत. पण अण्णा यावर काहीच बोलणार नाहीत. पण यामुळे आनंदीला खूप वाईट वाटणार आहे. पण अण्णांनी काहीही प्रतिक्रिया न देण्यामागे एक विशेष कारण आहे. त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच चिंता आहे, “या सगळ्या प्रकारामध्ये आनंदीचे बालपण तर हरवणार नाही ना? असे त्यांना वाटत आहे. कारण वाड्यामधील देवीचा चेहरा आणि आनंदीच्या चेहऱ्यामध्ये चांगलेच साम्य आहे आणि आता आनंदीची पूजा यामुळे अण्णा अजूनच चिंतेत पडले आहेत. पण आनंदीचा रुसलेला चेहरा बघून ते तिला गुलकंद देणार आहेत. गुलकंद देऊन अण्णांनी आनंदीचे कौतुक केले असले तरी या सगळ्यामध्ये आनंदीचे बालपण नाही ना हरवणार याची त्यांना चिंता लागणार आहे.