स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केला आहे. या मालिकेतील दीपा-कार्तिक प्रमाणेच दीपिका आणि कार्तिकीदेखील घराघरात पोहचल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकीची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. दरम्यान आज बालदिना निमित्ताने आपण त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल जाणून घेऊयात तेही त्या दोघींकडून.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपिकाची भूमिका बालकलाकार स्पृहा दळी (Spruha Dali) हिने साकारली आहे. तर कार्तिकीची भूमिका मैत्रेयी दाते (Maitreyee Date) हिने निभावली आहे. दीपिका आणि कार्तिकीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. तशीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील छान आहे. याबद्दल बोलताना स्पृहा सांगते की, शूटिंगमुळे तुम्हाला वाटेल की आम्हाला खेळायला मिळत नसेल पण असं नाही. आम्ही सेटवर खूप खेळतो. अक्षरशः दंगा करतो. मी आणि मैत्रेयीची स्क्रीनवर जशी छान केमिस्ट्री आहे तशी ऑफस्क्रीनही आहे. त्यामुळे आम्ही खूप धमालमस्ती करतो. आम्ही दोघीच खेळत नाही तर इतरांनाही खेळायला लावतो. आमच्या सेटवर हसून खेळून वातावरण असतं. आमचं प्रोडक्शन हाउस खूप छान आहे. त्यामुळे आम्हाला काम करायला खूप मजा येते.
सेटवर असताना कोणती गोष्ट मिस करतात, असं विचारल्यावर स्पृहा म्हणाली, फॅमिली फंक्शन. आमची फॅमिली खूप मोठी आहे. त्यामुळे सतत काहीना काही कार्यक्रम असतात. पण, शूटिंगमुळे मला फारसे ते अटेंड करता येत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट मी खूप मिस करते. तर मैत्रेयी म्हणाली की, शूटिंगमुळे मला मुंबईत राहावे लागत आहे. त्यामुळे मी सर्वात जास्त माझी शाळा मिस करते. मी पुण्यातल्या जी. के. गुरूकुल तिसऱ्या इयत्तेत शिकते आहे. भलेही मी शाळेत जात नसले तरी मी सेटवर आणि घरी वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करते. तसेच मी माझा कथ्थक क्लास मिस करते आहे.