संगीताशी आपल्या सगळ्यांचं अतूट नातं आहे. “सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर” या पर्वामध्ये उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे परंतु मंचावर असणार आहेत लहान बाळगोपाळ. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरांची जादू प्रेक्षकांसमोर तसेच परीक्षकांसमोर सादर करत आहेत. लहान मुलं म्हणजे थोडी मस्ती आणि थोडा कल्ला होणारच पण याचबरोबर हे छोटे सूरवीर सुरांशी दोस्ती करून मंचावर मैफल रंगवत आहेत हे नक्की. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन या मुलांची निवड करण्यात आली आहे. आता या सगळ्या स्पर्धकांमधून फक्त २१ जणांची निवड करण्यात आली आहे. हे छोटे सूरवीर मंचावर सुरांची जादू पसरविण्यासाठी सज्ज झाले आहेत. एका पेक्षा एक सुंदर आवाज या मंचावर प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत. कालपासून गाला राउंडची रॉकिंग सुरुवात झाली आहे. निरागस आणि लोभस स्वरांनी “सूर नवा” कार्यक्रमाचा मंच बहरून जाणार आहे.
“सूर नवा” कार्यक्रमाच्या या पर्वामध्ये फुल दंगा मस्ती होणार आहे. कारण हे पर्व आहे छोट्या सूरवीरांचं. सूर नवाच्या मंचाला यावेळेस एक छोटा शाहीर मिळाला आहे ज्याने त्याच्या निरागस बोलण्याने, आवाजाने प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांचे आणि कार्यक्रमामधील प्रत्येकाचेच मनं जिंकले आहे. त्या बाळगोपाळाच नाव आहे हर्षद नायबळ. हर्षद अवघ्या पाच वर्षांचा असून तो औरंगाबादचा आहे. या कार्यक्रमामध्ये तो स्पर्धक नसला तरीसुद्धा तो या सगळ्या लहान मुलांचा मेंटॉर आहे. हर्षदने सादर केलेला पोवाडा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलाच तसेच त्याने साद केलेले खंडेरायाच्या लग्नाला हे गाण देखील सगळ्यांना आवडले. लहान मुलं निष्पाप असतात, आणि ते कधीही कोणाला काहीही विचारू शकतात. हर्षदने कार्यक्रमाची परीक्षक शाल्मली खोलगडेला देखील एक प्रश्न विचारून आश्चर्यचकित केले
“कि तू ऑडीशन्सला का नव्हती” इतकेच नसून “गाण म्हणेन पण नाचायचे नाही” असे देखील हर्षदने शाल्मलीला सांगितले. ठाण्याच्या ओंकारने देखील परीक्षक आणि कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशीला त्याच्या बडबडीने आणि प्रश्नामुळे आश्चर्यचकित केले. पण हे सगळे असूनसुध्दा हे छोटे सूरवीर अफलातून गाणी म्हटतात यात शंका नाही. या मज्जा मस्तीसोबतच काही स्पर्धकांनी परीक्षकांची वाहवा देखील मिळवली. नागपूरच्या उत्कर्ष वानखेडे याने मोरया चित्रपटातील कव्वाली सादर करून अवधूतचे मन जिंकले. आळंदी येथील चैतन्य देवढे जो ज्ञानेश्वर मेश्राम यांचा शिष्य आहे त्याने त्याच्या गुरुचेच झेंडा चित्रपटातील विठ्ठला कोणता झेंडा हे गाण सादर केले. चैतन्यने तिन्ही परीक्षकांची वाहवा मिळवली. आदी भरतीया याने देखील त्याच्या दणदणीत परफॉर्मन्सने उपस्थितीचे मन जिंकले.