चिन्मय मांडलेकर आता प्रेक्षकांना दिसणार या नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 4:06 PM
एक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी चिन्मय मांडलेकरची ओळख आहे. आता चिन्मय निर्मितीक्षेत्राकडेदेखील वळला आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या ...
एक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी चिन्मय मांडलेकरची ओळख आहे. आता चिन्मय निर्मितीक्षेत्राकडेदेखील वळला आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेद्वारे त्याने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले. त्याने निर्मिती केलेली ही मिनी सिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि आता सख्या रे या मालिकेची तो निर्मिती करत आहे. या मालिकेत सुयश टिळक, रुची सवर्ण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत चिन्मय काम करत नसला तरी या मालिकेद्वारे चिन्मयचे एक नवे रूप प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. चिन्मय आता एक गीतकार म्हणूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सख्या रे या मालिकेचे शीर्षकगीत त्याने लिहिलेले आहे. चिन्मय एक चांगला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. पण तो एक गीतकार असल्याची त्यालाही कल्पना नव्हती असे तो म्हणतो. या मालिकेच्या गीतलेखनाविषयी चिन्मय सांगतो, "कविता लिहायची म्हटली की, मला भीतीच वाटते. पण मालिकेचे शीर्षकगीत लवकारत लवकर तयार करायचे असे वाहिनीकडून सांगण्यात आले होते. मी माझ्या ओळखीतील अनेक गीतकारांना विचारले. पण त्यांच्याकडे वेळ नसल्याने काही दिवसांचा अवधी लागेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकदा तू माझा सांगाती या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मीच गीत लिहायला सुरुवात केली. खरे तर त्यावेळी मालिकेचे शीर्षकही ठरलेले नव्हते. मी दोन शीर्षकांचा विचार करून काही ओळी लिहिल्या आणि त्या संगीतकार पंकज पडघम यांना पाठवल्या. त्यांना या ओळी खूपच आवडल्या. त्यांनी काहीच दिवसांत या गाण्याला संगीत दिले आणि आता मी लिहिलेले गाणे शीर्षकगीत म्हणून वापरले जाणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग आम्ही लवकरच करणार आहोत."