काल बिग बॉस मराठीच्या नवीन घरात कल्ला टीव्ही कार्याचा दुसरा दिवस पार पडला. पॅडी कांबळे विरुद्ध धनंजय पोवार असा स्टँड अप कॉमेडीचा सामना रंगला. यावेळी छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडेने धनंजय पोवारला विजयी घोषित केले. यामुळे पॅडी चांगलाच दुखावलेला दिसला. त्याने घरातील सदस्यांसमोर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. इतकंच नव्हे तर पॅडीच्या डोळ्यात पाणी आलं.
म्हणून पॅडी ढसाढसा रडला
कल्ला टीव्ही कार्यात सादरीकरण धनंजय आणि पॅडी जेव्हा आमनेसामने आले तेव्हा छोटा पुढारीने पॅडीला विजयी न करता धनंजयला विजयी घोषित केलं. त्यामुळे पॅडी मनोमन दुखावला होता. त्याने शेवटी दुसऱ्या दिवशी किचन एरियात त्याच्या भावना व्यक्त केल्या. पॅडीच्या डोळ्यात पाणी आल्याने वैभवने त्याचे डोळे पुसले. पुढे पॅडी म्हणाला, "त्याला या क्षेत्रातलं किती कळतं मला माहित नाही. त्याने इथे काय काम केलंय मला माहित नाही. जेव्हा मी इथून बाहेर जाईल तेव्हा असं होणार की, त्याने पण तुला नाकारलं. तुझ्यात काय ऐपत आहे. काय कुवत आहे काम करण्याची. याचं मला रात्रीपासून वाईट वाटतंय."
छोटा पुढारीने पॅडीच्या पाया पडून मागितली माफी
पुढे छोटा पुढारी सुद्धा किचनमध्ये आला. सर्वजण त्याला सॉरी म्हणायला सांगत होते. तेव्हा पॅडी घनःश्यामला उद्देशून म्हणाला, "सॉरी म्हणावं म्हणून नाही. त्याच्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही. मी त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहतोय. पण तू माझ्या नजरा चुकवत आहेस." हे झाल्यावर घनःश्यामने बाहेर येऊन पॅडीचे पाय धरुन त्याची माफी मागितली. पॅडीने त्याला मिठी मारली.