Shivaji Satam Aka Acp Pradyuman Is Back: सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राइम सीरिज म्हणजे सीआयडी (CID). या मालिकेतील अभिनेते शिवाजी साटम यांच्या एसीपी प्रद्युमन या भूमिकेचा आणि त्यांच्या तोंडी असलेला 'कुछ तो गडबड है दया' या डॉयलॉगचा मोठा चाहतावर्ग आहे. पण, काही दिवसांपुर्वी मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आणि एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यामुळे या मालिकेतील शिवाजी साटम यांचा प्रवास संपल्याचं बोललं जातं होतं. तर दुसरीकडे टीआरपी वाढवण्यासाठी निर्मात्यांचा हा स्टंट असल्याचं बोललं गेलं. या सर्वा चर्चांमध्ये मात्र शिवाजी साटम यांना मालिकेत पाहायला मिळत नसल्यानं त्याचे चाहते निराश झाले होते. पण, आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूनंतर अभिनेता पार्थ समथानने मालिकेत एन्ट्री घेतली. तो एसीपी आयुष्मानची भूमिका साकारत आहे. पण, चाहत्यांना एसीपी प्रद्युमन यांना पहायचं आहे. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार असल्याचं दिसतंय. शिवाजी साटम पुन्हा एकदा शोमध्ये परतत असल्याची माहिती समोर येत आहे. आता या मालिकेशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेता पार्थ समथानने त्याच्या सोशल मीडियावर शिवाजी साटम यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ हा शिवाजी साटम यांना भेटताना दिसतोय. रिपोर्टनुसार, शिवाजी साटम आणि पार्थ यांनी काही सीन शूट केल्याचं बोललं जात आहे. पण, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकदा शोमध्ये दिसणार की नाही, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
एसीपी प्रद्युमन या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हे पात्र आणि शिवाजी साटम दोन दशकांहून अधिक काळ सीआयडीशी जोडलेले आहेत. 'दया दरवाजा तोड़ दो' आणि 'कुछ तो गडबड है दया' हे त्यांचे संवाद नेहमीच लोकांच्या तोंडावर असतात. CID या क्राइम सीरिजचा पहिला भाग २१ जानेवारी १९९८ रोजी प्रसारित करण्यात आला होता. या टीव्ही मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १ हजार ५४७ भाग प्रसारित झाल्यानंतर CID ने २०१८ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, काही महिन्यांपूर्वीच मालिका सीझन २ सह पुन्हा सुरु झाली. या मालिकेतील अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युम्न हे पात्रे प्रेक्षकांचे अगदीच लाडके आहेत.