CID या लोकप्रिय मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचे आहेत. दया, अभिजित, एसीपी प्रद्युम्न सह अनेक पात्रांना लोकप्रियता मिळाली. यापैकीच फ्रेडरिक ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मालिकेतील सर्वच सहकलाकार जे कुटुंबाप्रमाणेच एकत्र होते सर्वांनाच धक्का बसला आहे. तसंच CID च्या चाहत्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
अभिनेते दिनेश फडणीस यकृताच्या आजाराशी झुंज देत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका नाही तर अन्य आजारामुळे त्यांच्या लिव्हरवर परिणाम झाला होता. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाती. CID मधील सर्व कलाकार सध्या दिनेश यांच्या कुटुंबाला आधार देत आहेत. मालिकेतील सहकलाकार श्रद्धा मुसळेने सोशल मीडियावर दिनेश यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
सीआयडीतील सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की,'होय हे खरं आहे दिनेश आता आपल्यात नाहीत. मध्यरात्री जवळपास १२ च्या सुमारास त्यांचं निधन झालं. मी सध्या त्यांच्या घरीच आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. सीआयडीचे इतरही सर्वच कलाकार आले आहेत.'
दिनेश फडणीस यांना CID मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. फ्रेडिरिक्स हे विनोदी पात्र त्यांनी साकारलं. याशिवाय दिनेश यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्येही कॅमिओ केला होता. काही चित्रपटांमध्येही त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत.