Happy Birthday Aditya Srivastava: टेलिव्हिजनवरील अशा मोजक्याच मालिका आहेत की ज्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. सीआयडी ही त्यातीलच एक मालिका. या मालिकेतील कलाकारांनी अभिनयापलिकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनामनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यातील इन्स्पेक्टर अभिजीत हे पात्र साकारणारा अभिनेता आदित्य श्रीवास्तव देखील चाहत्यांचा आवडता कलाकार. आज आदित्य श्रीवास्तव यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे.
कुठे आहेत आदित्य श्रीवास्तव?आदित्य श्रीवास्तव यांना त्यांच्या स्वत:च्या नावानं फार क्वचितच लोक ओखळत असतील. कारण सीआयडीमधील इन्स्पेक्टर अभिजीत हे पात्र त्यांनी इतक्या बेमालूमपणे साकारलं की हेच त्यांचं खरं नाव असल्याचं सर्वांना वाटतं. सोनी टेलिव्हिजनवरील सीआयडी मालिकेत श्रीवास्तव यांनी केवळ इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकरली नाही, तर ती भूमिका जगली आहे. सीआयडीचा पहिला एपिसोड १९९८ साली रिलीज झाला होता आणि शेवटचा एपिसोड २०१८ साली टेलिव्हिजन प्रदर्शित झाला.
आदित्य श्रीवास्तव हे फक्त टेलिव्हिजन पुरते मर्यादित कलाकार राहिलेले नाहीत. त्यांनी अनेक बॉलीवूड सिनेमांमध्येही आपलं अभिनयाचं कसब सिद्ध करुन दाखवलं आहे. १९६८ साली उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जन्म झालेल्या आदित्य श्रीवास्तव यांनी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये खूप लांबवरचा प्रवास आजपर्यंत केला आहे. पण त्यांना खरी ओळख सीआयडी मालिकेनच दिली. सीआयडी संपल्यानंतर आदित्य श्रीवास्तव बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनच्या सुपर-३० सिनेमात लल्लन सिंह नावाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर ते कोणत्याही चित्रपटात दिसलेले नाहीत.
सोशल मीडियातही सक्रीय नाहीतसध्याच्या जमान्यात जिथं प्रत्येक लहान-मोठा कलाकार सोशल मीडियावर सक्रीय पाहायला मिळतो. पण आदित्य श्रीवास्तव मात्र सोशल मीडियात फारसे सक्रीय नाहीत. बऱ्याच काळापासून आदित्य श्रीवास्तव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या प्रोजेक्टबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सीआयडीच्या दुसऱ्या सीझनचा उल्लेख केला होता. पण त्याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
सुपर-३० चित्रपटाआधी आदित्य श्रीवास्तव यांनी बँडेड क्वीन, सत्या, दिल से, साथिया, लक्ष्य, ब्लॅक फ्रायडे, गुलाल आणि मोहनदास या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच टेलिव्हिजन मालिकांमध्ये सीआयडी व्यतिरिक्त रात होने को है, अदालत, रिश्ते, स्टार सेलर, ९ मालाबार हिल, ये शादी नहीं हो सकती, व्योमकेश बक्शी आणि कवी कालिदास सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. हे सारं असलं तरी सीआयडीमधील इन्स्पेक्टर अभिजीतच्या पात्राला तोड नाही. आता लवकरच आदित्य श्रीवास्तव यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्व होवो. लवकरच ते ऑनस्क्रीन पाहायला मिळोत हीच इच्छा आणि वाढदिवसाच्या सदिच्छा!