कलाविश्व आणि राजकारण यांचा तसा पाहायला गेलं तर जवळचा संबंध आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी राजकारणाची वाट धरली आहे. यामध्येच सध्या अभिनेता नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे. नाना पाटेकर लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या चर्चा संपत नाही. तोच आता CID फेम अभिनेता शिवाजी साटम यांनी राजकीय प्रवेशाविषयी भाष्य केलं आहे.
CID या मालिकेत शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युमन ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. शिवाजी साटम यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचा दिसून येतो. यामध्येच त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयी भाष्य केलं आहे. अलिकडेच मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या वार्तालाप कार्यक्रम शिवाजी साटम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राजकारण आणि त्यात प्रवेश करण्यात रस नसल्याचं म्हटलं आहे.
'News 18 मराठी'नुसार, "मालिका आणि सिनेमांमध्ये मी अनेकदा राजीतय नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातच मी समाधानी आहे. मला राजकारणात येण्यात काहीही रस नाही. मी एक कलाकार म्हणूनच ठीक आहे", असं म्हणत शिवाजी साटम यांनी राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, नुकताच त्यांचा 'बांबू' हा सिनेमा रिलीज झाला. त्यापूर्वी ते 'दे धक्का 2' या सिनेमात झळकले होते.