टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'सीआयडी'चे निर्माते प्रदीप उप्पूर (Pradeep Uppur) यांचं निधन झालं आहे. अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजित हे पात्र तर खूप गाजले. एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyumna) ही भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) प्रदीप यांच्या निधानाच्या बातमीने भावूक झाले आहेत. त्यांनी पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली.
निर्माते प्रदीप उप्पूर यांना कर्करोगाने ग्रासले होते. सिंगापूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मालिकेतील कलाकारांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अभिनेते शिवाजी साटम यांनी इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, 'प्रदीप उप्पर, (सीआयडीचे निर्माते, आधारस्तंभ...हसमुख मित्र, प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता, मनाने उदार, तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चॅप्टर संपला आहे. खूप प्रेम आणि तुझी आठवण येत राहील मित्रा.'
कोण होते प्रदीप उप्पूर?
प्रदीप उप्पूर हे प्रसिद्ध निर्माते होते. 'नेलपॉलिश' हा त्यांचा शेवटचा सिनेमा. दोन वर्षांपूर्वी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. ते इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांनी अनेक ऑफ बिट शोजची निर्मिती केली आहे. 'आहट', 'सीआयडी' याशिवाय 'सुपकॉप्स वर्सेस सुपरव्हिलेन्स' तसेच 'सतरंगी ससुराल' या मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका बसला आहे.