छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. महाराष्ट्राचा हा लाडका कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. प्रत्येक घरात या शोचे चाहते आहेत. या शोमधील हास्यवीरांवर चाहते भरभरुन प्रेम करतात. हास्यजत्रेत विविध आवाज काढून, मिमिक्री करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या समीर चौघुलेंचा चाहता वर्गही मोठा आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्याचे फवारे उडवणाऱ्या चौघुलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फॅन झाले आहेत.
एकनाथ शिंदेंनी भर कार्यक्रमात समीर चौघुलेंचं कौतुक केलं आहे. दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात समीर चौघुले आणि 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखलेने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात समीर चौघुलेचं कौतुक केलं. चौघुलेंचा मोठा फॅन असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समीर चौघुलेंचं कौतुक करत एकनाथ शिंदे म्हणाले, "अमिताभ बच्चन तुमचे फॅन आहेत, असं तुम्ही मगाशी म्हणालात. खरं तर मी पण तुमचा फॅन आहे. माझ्या घरचे हास्यजत्रा बघतात. कधीकधी मीदेखील हास्यजत्रा बघतो. राज्याचा कारभार बघताना कधी काय होईल, कोण काय बोलेल, हे सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे गॅसवर असतो. तारेवरची कसरत असते. कोव्हिडमध्येही आपण सगळ्यांनीच चांगलं काम केलं." शिंदेंच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.