लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. या मालिकेच्या टीमने केक कापून आपला हा आनंद साजरा केला. यावेळी मालिकेतील सगळेच कलाकार, तंत्रज्ञ सेटवर उपस्थित होते. या मालिकेचे नाव आणि नॉट आउट १०० असे या केकवर लिहिण्यात आलेले होते. ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका आणि मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. विशेषकरून प्रेक्षकांना प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचे सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार प्रचंड आवडले आहेत. गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी, प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. समृद्धीची ही पहिलीच मालिका असली तरी तिने आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
निसर्गासारखी अवखळ, सगळ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी, बिनधास्त, स्वाभिमानी अशी लक्ष्मी. जिला मामाने जरी वाढवले असले तरी देखील त्याच्या नजरेत ती पांढऱ्या पावलांची झाली. कारण तिचा जन्म होताच लक्ष्मीची आई जग सोडून गेली.यामुळे गावाला आपलीशी वाटणारी लक्ष्मी घरच्यांसाठी परकीच राहिली. गावामध्ये सगळ्यांचे प्रेम मिळवलेल्या लक्ष्मीने घरामध्ये सगळ्यांची उपेक्षा आणि मामीचा जाच नेहमीच सहन केला आहे. पण इतकं सगळ सहन करून देखील ती खंबीर आहे, ती रडत बसली नाही. अशा या आगळ्यावेगळ्या स्वभावाच्या लक्ष्मीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका शहर आणि गावं यांच्यातला दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमळत्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. मल्हार परदेशी शिकून गावी आलेला असल्याचे दाखवण्यात आले आहे तर आर्वी ही डॉक्टर असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.