कलर्स मराठीवर लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. रमा -राघव आणि पिरतीचा वणवा उरी पेटला अशी या मालिकांची नावं आहेत. एकाच दिवशी म्हणजे येत्या 9 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या मालिकांचा नुकताच प्रोमो रिलीज करण्यात आला आणि एका मालिकेचा प्रोमो पाहून लोक खवळले. आता काय, तर सुरू होण्याआधीच ही मालिका बंद करा, अशी मागणी अनेकांनी सोशल मीडियावर केली आहे.
होय, कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या आगामी मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. तूर्तास हा प्रोमो पाहून लोक भडकले आहेत. प्रोमोत एक श्रीमंत बाई पैशानं भरलेली बॅग घेऊन बँकेच्या बाहेर येते आणि बॅग आपल्या गाडीत ठेवते. त्याचवेळी मालिकेतील नायिका त्या बाईला फसवून त्या पैशांची चोरी करते आणि तो चोरीचा पैसा गावच्या मुलांच्या भल्यासाठी असल्याचं सांगते. करणार आहे असेही सांगते..‘आपण चोरी नाही करत,आपण लेव्हल करतो.. समाजात बॅलेन्स राहिला पाहिजे,’अशी टॅगलाईन असलेला मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘चुकीचा संदेश देताय समजाला... अशाने गुन्हेगारी वाढत असते...शिक्षण नाही,’अशी प्रतिक्रिया एका युजरने नोंदवली आहे. ‘चोरी करायला शिकवायचं असेल तर मग नको असली सीरिअल... चोरी ही चोरीच असते,’अशा शब्दांत एका युजरने या मलिकेला विरोध केला आहे. चांगलं शिकवताय समाजाला सिरिअलच्या माध्यमातून..., अशी उपरोधिक कमेंट एका युजरने केली आहे. उद्या सगळे चोर असेच बोलतील, असं एका युजरने म्हटलं आहे.