सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत कॉमेडी किंग कपिल शर्माही लग्नबंधनात अडकणार आहे. खुद्द कपिलनेच इन्स्टाग्रामवर आपली लग्न पत्रिका शेअर करत फॅन्सना ही गुड न्युज दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कपिलच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या.मात्र यावर कपिलकडून कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. आता खुद्द कपिलनेच त्याच्या लग्न पत्रिका शेअर करत सा-यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. 1२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार. सध्या कपिलच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू झाली आहे.
कपिलचे लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडणार आहे. येत्या १० तारखेपासून या लग्नाचे विधी सुरू होतील. सर्वप्रथम १० तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी ‘माता का जागरण’ आहे. यानंतर दुस-या दिवशी संगीत आणि यानंतर मेहंदी होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही कळतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.
गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून सावरला असून छोट्या पडद्यावर परतण्यास सज्ज आहे. तुर्तास कपिलला त्याच्या आयुष्याची नवीन सुरूवात कऱणार म्हटल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.