अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारा शरद मल्होत्रा अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड रिप्सी भाटियासोबत त्याने लग्न केले. शीख परंपरेनुसार गुरुद्वाऱ्यामध्ये यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. तसेच मुंबईत कुटुंब आणि मित्र मंडळींसाठी ग्रँड रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले आहे. विवाह सोहळ्यानंतर शरद आणि रिप्सीने शानदार फोटोसेशनसुद्धा केले.
यावेळी या नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी रिप्सी लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. गेल्या वर्षी आपल्या नात्याला जन्मोजन्मीच्या बंधनात बदलण्याचा निर्णय या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला.त्यानंतर दोघांनी अत्यंत साधेपणाने साखरपुडा केला होता.
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहते शुभेच्छांचा वर्षाव तर करत आहेतच. त्याचबरोबर जवळच्या मित्रांनी “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळतंय.
रिप्सीच्या आधी शरदचे अफेयर दिव्यांका त्रिपाठीसोबत होते. त्यांनतर शरदचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बिष्टसोबतही जोडले गेले होते. रिप्सी ही फॅशन डिझायनर असून गेल्या कित्येक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा मीडियात सुरू होती. मात्र शरदने त्याच्या अफेरबाबत मौन बाळगले होते. योग्य वेळ आल्यावरच यावर उत्तर देणार असल्याचे त्याने म्हटले होते. काही महिन्यांपूर्वीच त्याने रिप्सीसह सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.