'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी महांगडेचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे काल कोरोनाने निधन झाले आहे. त्यानंतर अश्विनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपल्याचे म्हटले आहे.
अश्विनी महांगडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला. कधी कधी स्वतःचे कपडे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करीत राहिले व मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले पण अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला व आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले की समाजासाठी काही केले नाही तर आपले आयुष्य निरर्थक.
कोरोनाच्या संकटात अश्विनी महांगडे अनेकांच्या मदतीसाठी धावून आली आहे. तिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे.