कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता 21 दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांसोबत सेलिब्रेटीदेखील घरातच आहेत. यासोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात आधी बंद झाल्या त्या शाळा. नंतर हळूहळू बाहेर पडणं बंद झालं. त्यामुळे या मुलांकडे घरात बसून खेळण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. पण तुम्ही नीट निरीक्षण करून पाहा ही मुले अजून काही कंटाळली नसतील. त्यांना रोज काहीनाकाही नवीन कल्पना नक्कीच सुचत असतील. लहान मुलं म्हणजे विविध क्लृप्त्यांनी भरलेलं भांडार आणि त्यात आजकालची पिढी ही खूप प्रगत आहे. असाच आहे आपला पार्थ बने.
लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सध्या चित्रपट आणि मालिका यांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे आणि अशा वेळी सोनी मराठीवरील 'ह.म. बने तु.म. बने' मालिकेतील लहान सदस्य पार्थ बने उर्फ केदार आगस्कर त्याचा क्वारंटाईन वेळ शेती करण्यात घालवतोय.
या चिमुकल्या केदारने घरी राहून त्याच्या घराच्या बागेत मेथी, छोले, टोमॅटो, वांगी, चवळी या भाज्यांची शेती केली आहे. कोणती भाजी तयार झाली आहे आणि कोणती भाजी अजूनही लहान आणि कोवळी आहे याचे ज्ञानदेखील केदारला आहे.केदार आगास्करने त्याच्या शेतीमध्ये फेरफटका मारणारा व्हिडिओ सोनी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात तो इतक्या गोड अंदाजात त्याने केलेल्या शेतीबद्दल सांगतो आहे.