कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात सध्या लॉकडाऊन असून आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे.
जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन असल्याने अभिनेत्री माहिका शर्मा सध्या इंग्लंडमध्ये अडकली आहे. युकेमध्ये कोरोनो व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत हजारोहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तिथली परिस्थिती अतिशय भीषण असून लोकांना घराच्या बाहेर देखील पडणे कठीण झाले आहे. माहिका काही दिवसांपूर्वी लंडनला फिरायला गेली होती. पण आता तिथे लॉकडाऊन असल्याने तिथे थांबण्याशिवाय तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाहीये.
माहिका ही टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने एफआयआर मालिकेत काम केले होते. तिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मी लंडनला फिरायला गेले होते. मी भारतातून लंडनला फिरायला गेले, त्यावेळी सगळेच वातावरण अतिशय नॉर्मल होते. पण कोरोनामुळे लंडनमध्ये लॉकडाऊन आहे. मी कोरोनाच्या भीतीने कुठेच बाहेर पडत नाहीये. लंडन शहरात लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा देखील तुडवडा निर्माण झाला आहे. मी गेल्या काही दिवसांपासून केवळ फळं आणि ज्युस खाऊनच पोट भरत आहे. मी भारतात परत येण्याची आतुरतेने वाट पाहात आहे.