Join us

"त्याने दोनदा चाकूने वार केले, डोक्यात लोखंडी खांब घातला आणि...", हल्ल्यात 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 09:23 IST

'क्राइम पेट्रोल' फेम आणि बॉलिवूड सिनेमा, वेब सीरिडमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारीवर शनिवारी(४ जानेवारी) हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

'क्राइम पेट्रोल' फेम आणि बॉलिवूड सिनेमा, वेब सीरिडमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारीवर शनिवारी(४ जानेवारी) हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वर्सोवा येथे धारदार शस्त्रांनी राघववर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राघव जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत आरोप मोहम्मद जैद परवेझ शेख याच्याविरोधात कलम ११८(१) आणि ३५२ अंतर्गत तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

नेमकं काय घडलं?

शनिवारी राघव त्याच्या मित्राबरोबर शॉपिंग करून घरी येत होता. तेव्हा रस्ता क्रॉस करताना एका बाईकला तो धडकला. राघवची चूक असल्याने त्याने लगेच माफीही मागितली आणि तो पुढे गेला. परंतु, दुचाकीस्वाराने राघवला शिवीगाळ केली. जेव्हा राघवने याबाबत विचारलं तेव्हा दुचाकीस्वाराने बाईकवरुन उतरून त्याच्यावर चाकूने दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातून राघवने स्वत:चा बचाव केला. पण, नंतर आरोपीने त्याला लाथ मारली. ज्यामुळे तो खाली पडला. 

हा संपूर्ण प्रसंग राघवने सांगितला. तो म्हणाला, "त्यानंतर आरोपीने बाईकच्या डिकीतून दारूची एक बाटली आणि लोखंडाचा खांब काढला. मी स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्यावरील लाकडाची काठी उचलली आणि त्याच्या हातावर मारली. त्यामुळे त्याच्या हातातील दारूची बाटली खाली पडली. त्यानंतर त्याने लोखंडी खांबाने माझ्या डोक्यात दोन वेळा वार केला. ज्यामुळे मला गंभीर दुखापत झाली आहे". 

या हल्ल्यानंतर राघवच्या मित्राने ताबोडतोब त्याला घेत हॉस्पिटल गाठलं. उपचारानंतर पोलीस स्टेशन गाठत त्यांनी तक्रार नोंदवली. पण, अद्याप आरोपीला पकडण्यात आलेलं नाही. त्यामुळे राघवने नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी राघवच्या बिल्डिंगच्या खालीही दिसल्याचं अभिनेत्याचं म्हणणं आहे. मला किंवा माझ्या कुटुंबीयांना काही झालं, तर यात पोलिसांची चूक असेल, असं राघवने म्हटलं आहे. 

टॅग्स :क्राइम पेट्रोलटिव्ही कलाकार