छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'दार उघड बये'. ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरत आहे. दिवसेंदिवस रंजक होत असलेल्या या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेत रावसाहेब नगरकर यांच्या जुळ्या भावाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ही मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. यामध्येच सध्या या मालिकेतील दोन कलाकारांची चर्चा रंगली आहे. हे दोन्ही कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नवरा-बायको आहेत.
'दार उघड बये' या मालिकेतील रावसाहेबांची बहीण अंबिका आणि तिचा नवरा यांची मालिकेत एन्ट्री झाल्यापासून नगरकर कुटुंबाची डोकेदुखी वाढली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या कटकारस्थानाला माधवी नगरकर सुद्धा साथ देत आहे. त्यामुळे सध्या ही तिकडी चांगलीच चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे या तिघांपैकी २ जण खऱ्या आयुष्यात नवरा-बायको आहेत.
या मालिकेत अंबिका आत्याच्या नवऱ्याची म्हणजेच देवदत्त याची भूमिका अभिनेता लक्ष्मीकांत दाभोळकर साकारत आहेत. तर, माधवी नगरकरची भूमिका अभिनेत्री माधवी दाभोळकर साकारत आहेत. हीच जोडी खऱ्या आयुष्यात नवरा-बायको आहेत. हे दोघंही गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत आहेत. या दोघांनीही नाटक, मालिका, चित्रपट अशा प्रत्येक ठिकाणी काम करुन आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
दरम्यान, माधवी दाभोळकरने अवघाची संसार, तेरा दिवस प्रेमाचे, नवरा माझा नवसाचा अशा मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. माधवी आणि लक्ष्मीकांत यांना शांभवी आणि आराध्य ही दोन मुलं असून त्यांच्या लेकीचं लग्न झालं आहे. शांभवी पार्लर आणि हॉटेल असे एकाच वेळी दोन व्यवसाय सांभाळते. तर, त्यांचा लेक आराध्य सोशल मीडियावर त्याचे फिटनेस ब्लॉग शेअर करत असतो.