छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बठीजाने 2017 मध्ये कवलजीत सलूजासोबत लग्न केले होते. कवलजीत हा डीजे असून त्या दोघांची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली होती. काहीच दिवसांत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला केवळ दोनच वर्षं झाली असताना आता प्रियाने आता वेगळे राहाण्याचा निर्णय घेतला आहे. कवलजीतच्या आधी प्रियाचे लग्न अभिनेता जतिन शाहसोबत झाले होते. पण हे देखील तिचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
प्रियाने स्पॉट बॉय या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याविषयी आणि घटस्फोट घेण्याच्या निर्णयाविषयी सांगितले आहे. ती सांगते, मला माझ्या आयुष्यातील या खाजगी गोष्टीविषयी बोलावे लागत आहे हेच अतिशय वाईट आहे आणि त्यातही ज्या मुलीच्या आयुष्यात ही घटना दुसऱ्यांदा घडली तिची अवस्था काय असेल याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही. माझे पहिले लग्न लव्ह मॅरेज होते. त्यावेळी घडलेल्या घटनांनंतर माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता. पण कवलजीत आयुष्यात आल्यावर मी लग्नाचा विचार केला.
मी माझे संपूर्ण करियर सोडून त्याच्यासोबत रायपूरमध्ये स्थायिक झाले. मी, कवलजीत आणि त्याचे आई-वडील आम्ही सगळेच तिथे एकत्र राहात होतो. पण कवलजीतला मुंबईत यायचे होते आणि त्यामुळे आम्ही दोघे मुंबईला स्थायिक झालो. मुंबईत आल्यानंतर त्याचे करियर बनवण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. पण त्याने केवळ मुंबईत येण्यासाठी माझा वापर केला होता. मी त्याचे मुंबई येण्याचे तिकीट होते हे मला त्याच्या वागणुकीतून कळायला लागले होते. मी घरगुती हिसेंची देखील शिकार झाले. अखेरीस कंटाळून मी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्याने संगनमताने घटस्फोट घेण्यासाठी माझ्यावर दबाब टाकला. मी घटस्फोट घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात करावी अशी माझ्या वडिलांची देखील इच्छा असल्याने मी यासाठी तयार झाले.
प्रियाने कमस से, बसेरा, बाबा ऐसा वर ढुंडो यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने नुकतीच डायन या मालिकेत साकारलेली आशाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.