कलर्सची केसरी नंदन ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक प्रेरणादायी कथा पाहायला मिळत असून त्यात केसरी (चाहत तेवानी) नावाच्या एका लहान मुलीचा संघर्ष दाखविण्यात आलेला आहे. कुस्ती हा खेळ खेळण्याचे तिचे स्वप्न आहे, तिचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रवास प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आजवर प्रेक्षकांना केसरीच्या जीवनातील अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत.
सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार, केसरीला तिचे शिक्षण आणि कुस्तीचे प्रशिक्षण सुरू ठेवण्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. तिचा भाऊ जगतचा (शोएब अली) एक अपघात झाला असून त्यामुळे तो आयुष्यभर चालू शकणार नाही. पण जगत या परिस्थितीत देखील केसरीला पाठिंबा देणार आहे आणि तो तिला धन्वा कुस्ती संघटनेमध्ये घेऊन जाणार आहे. या दरम्यान, केसरीला भैरो सिंग भेटणार असून ते एक प्रशिक्षित पहिलवान आहेत आणि ती त्यांना तिला कुस्ती शिकविण्यासाठी आणि व्यावसायिक पहिलवान बनविण्यासाठी विनंती करणार आहे आणि ती चांगली पहिलवान असल्याचे त्यांना पटवून देणार आहे.
भैरो सिंगचे पात्र या मालिकेत टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते दक्ष अजित सिंग साकारणार आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी बोलताना दक्ष अजित सिंग सांगतात, “हे पात्र साकारण्याची मला उत्सुकता लागली आहे. कारण ते पात्र मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळे आहे. महिला सशक्तीकरणासाठी पाठिंबा देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या शोमध्ये सहभागी होण्याचा मला आनंद होत आहे. या भूमिकेसाठी माझा विचार केल्याबद्दल मी कलर्सचा आभारी आहे आणि मला आशा आहे की मला अशा वेगळ्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांनाही आवडेल.”
केसरीच्या जीवनात भैरो सिंग कोणते बदल घडवून आणतील? हे प्रेक्षकांना केसरी नंदन या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता कलर्सवर पाहायला मिळत आहे.