‘डान्स दीवाने 3’चा (Dance Deewane 3 ) अँकर राघव जुयालला (Raghav Juyal )आसामच्या एका चिमुकलीची मस्करी चांगलीच महागात पडली. होय,‘डान्स दीवाने 3’चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि राघव नेटक-यांच्या निशाण्यावर आला. केवळ नेटकरीच नाहीत तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही राघवला फैलावर घेतलं. यानंतर काय तर राघवला माफी मागावी लागली.‘डान्स दीवाने 3’ रिअॅलिटी शोच्या मंचावर स्पर्धक म्हणून आलेली आसामची गुंजन सक्सेना हिची ओळख करून देताना राघव जे काही बोलला, ते ऐकून अनेकांचा संताप अनावर झाला. व्हिडीओत गुवाहाटीची गुंजन मंचावर येते आणि तिचा परिचय देताना राघव तिला मोमो,चाऊमीन, चायनीज म्हणत विचित्र भाषेत बडबडतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी राघवला ट्रोल करणं सुरू केलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विट करत याविषयी नाराजी व्यक्त केली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे ट्विट ‘ एका लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाने गुवाहाटीमधल्या एका स्पर्धकाविरुद्ध वर्णद्वेषी भाषेचा वापर केल्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आलाय. हे अत्यंत लज्जास्पद आणि अस्वीकार्य आहे. आपल्या देशात वंशवादाला स्थान नाही आणि आपण सर्वांना याचा निषेध केला पाहिजे,’ असं ट्विट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं.
राघव म्हणाला...
हा वाद अंगलट येण्याची चिन्हं दिसताच राघवने माफी मागितली. एक व्हिडीओ शेअर करत, त्याने क्षमायाचना केली. गुंजन आसाममधून आली होती आणि मला चायनीज बोलणं आवडतं, असं म्हणाली होती. तेव्हापासून आम्ही तिला चीनी भाषा बोलून दाखवं असं म्हणायचो आणि ती बोलायची. तिला चीनी भाषा येत नव्हती. आम्ही केवळ मस्ती म्हणून हे करायचो. मी सर्वांचा आदर करतो. वंशद्वेष, वर्णद्वेष याला माझ्या आयुष्यात अजिबात थारा नाही. कृपा करून पूर्ण व्हिडीओ पाहा. मी चुकीचं बोललो असेल तर मला शिव्या घाला. पण प्रत्यक्षात असं काही घडलंच नाही. याऊपरही अजानतेपणी मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा, असं तो या व्हिडीओत म्हणाला.