' डान्स महाराष्ट्र डान्स ' आता येतंय औरंगाबाद मध्ये !!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 4:12 AM
असेल तुमच्यात जोश तर उडवा सर्वांचे होश हा विचार घेऊन झी युवावर दाखल झालेल्या 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोच्या ...
असेल तुमच्यात जोश तर उडवा सर्वांचे होश हा विचार घेऊन झी युवावर दाखल झालेल्या 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोच्या ऑडिशनचे पहिले पाऊल नुकतेच ऑरेंजसिटी नागपूरमध्ये थिरकले. नागपूरकरांनी प्रचंड धमाल करत या ऑडिशनला ऐन थंडीतही सळसळता उत्साही प्रतिसाद दिला. नागपूरनंतर आता झी युवाची ऑडिशन टीम लेण्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये येत आहे. औरंगाबादमधील डान्स टॅलंटला हक्काच मंच मिळणार आहे. या ऑडिशनमध्ये ४ वर्षापुढील कोणत्याही वयोगटातले स्पर्धक सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेला जसे वयाचे बंधन नाही तसेच विशिष्ट नृत्यप्रकारचेही बंधन नसेल. यात तुम्ही एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. वेगवेगळ्या पाश्चिमात्य डान्स स्टाइल्सला मराठमोळा तडका देऊन नृत्याविष्कार सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. मनासोबत नृत्यातूनही मराठीपणाची भावना रुजवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याने उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे. झी युवा वाहिनीवरील डॉ. अजंली अर्थात सुरूची अडारकर खास औरंगाबादच्या डान्सर्सना चिअरअप करण्यासाठी येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक कलाकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोने करण्याची वाट पाहत असतात. मात्र अशा संधी फार कमी येतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी संगीत सम्राट या कार्यक्रमाला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील गायकीला त्यामुळे एक वेगळा दर्जा मिळाला. नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. डान्स म्हणजे स्वातंत्र्य, डान्स म्हणजे नजाकत, डान्स म्हणजे भावना आणि डान्स म्हणजे बेभानता. बेभान होऊन नाचताना त्या नृत्याला जेव्हा मराठमोळा स्पर्श असेल तेव्हा त्याची मजा काही निराळीच असेल. हीच खासियत असणार आहे झी युवावर सुरु होणाऱ्या 'डान्स महाराष्ट्र डान्स' या रिऑलिटी शोची. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले नृत्यगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.