गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील प्रसिद्ध अभिनेता. गौरवने फार कमी कालावधीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गौरवची आज सर्वांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता म्हणून ओळख आहे. गौरवने 'वायफळ' या पॉडकास्ट मुलाखतीत त्याच्या आयुष्यातला धमाल किस्सा शेअर केलाय.
या मुलाखतीत गौरवने सांगितलंय की, लहानपणी तो त्याच्या चाळीतील गणेशोत्सव आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी ज्या डान्सच्या स्पर्धा असायच्या त्यात भाग घ्यायचा. अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स करणं गौरव मोरेला आवडायचं. कारण डान्स स्टेप्स सोप्या असायच्या. अशातच गौरव मोरेने एकदा मैत्रिणीसोबत 'किसी डिस्को में जाए' गाण्यावर धम्माल डान्स केला. हा डान्स झाल्यावर मात्र मैत्रिणीला तिच्या आईकडून मार खावा लागला होता. "मुलींना काही बंधनं होती, त्यामुळे अशा गाण्यावर डान्स केल्याने तिला मार खावा लागला", असं गौरव म्हणाला. या गोष्टीचं गौरवला वाईट वाटलं.
याशिवाय एकदा गौरव आणि त्याचे दोन मित्र अशा तिघांनी 'गोली मार भेजे में' गाण्यावर डान्स केला. हा डान्स बघून त्याच्या विभागातल्या लोकांनी डोक्यावर हात मारला. ही पोरं आधीच 'छपरी' आणि गाणं निवडलंय ते 'डबल छपरी' असं लोकांचं म्हणणं होतं. पण कोण काय म्हणतंय याची गौरवला काळजी नव्हती. अशाप्रकारे गौरवने त्याच्या बालपणीचे धम्माल किस्से या मुलाखतीत सांगितले.