नाटक असो, मालिका असो वा सिनेमा... तिनही माध्यमांवर वर्चस्व गाजवणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सध्या सगळीकडे सुबोधचाच दबदबा पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याला एका व्यक्तीने मात्र आपल्या तालावर नाचवलं, आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आहे अभिनेत्री मानसी नाईक. ‘स्टार प्रवाह’वरील ‘दिन दिन दिवाळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबोध-मानसीने पहिल्यांदाच गाण्यांवर एकत्र ठेका धरला. मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ समजला जाणाऱ्या सदाबहार गाण्यांवर या दोघांनी परफॉर्म केले.
मानसी जरी उत्तम नृत्यांगना असली तरी तिच्यामते सुबोधचा उत्साह थक्क करणारा होता. ‘मी आणि सुबोध खूप चांगले मित्र असल्यामुळे डान्समध्येही तिच केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं मानसीने सांगितलं. सुबोधसोबत मी याआधी कधीच परफॉर्म केलं नव्हतं त्यामुळे थोडी भीती होती. पण रिहर्सलदरम्यान सुबोधने माझी भीती पळवली आणि आम्ही धमाकेदार नृत्य सादर करु शकलो. या परफॉर्मन्सनंतर सुबोधच माझ्यापेक्षा उत्तम डान्सर आहे हे मी ठोसपणे सांगू शकते अशी भावना मानसीने व्यक्त केली.’