मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हिंदी मालिकेत दिसणाऱ्या सुनील होळकर (४०) या मराठमोळ्या अभिनेत्याचे मुंबईत निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या सुनीलवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर घरी गेलेल्या सुनीलला अचानक उलटी झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. सुनीलच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. संध्याकाळी दहीसर येथील स्मशानभूमीत सुनीलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये सुनीलने अभिनय केला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटासोबतच अवधूत गुप्तेच्या ‘मोरया’ आणि दिग्दर्शक दीपक कदमच्या ‘सात बारा कसा बदलला’, ‘संगू निघाली सॅमसंग’ व ‘आयपीएल’ या चित्रपटांमध्ये सुनीलने अभिनय केला आहे. लेखक-दिग्दर्शक संतोष पवारच्या ‘यदा कदाचित’ आणि ‘यदा यदा ही धर्मस्य’ या गाजलेल्या नाटकांसोबतच ‘तुझी ती माझी’ आणि इतर काही नाटकांमध्ये भूमिका साकारत १५ वर्षांहून अधिक काळ त्याने मराठी रंगभूमीची सेवा केली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सुनील वरचेवर पोलिसांच्या भूमिकेत दिसायचा.