बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. या कार्यक्रमाचा १२ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील सलमान खान करत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहाता हा कार्यक्रम प्रेक्षकांना विविध भाषांमध्ये पाहायला मिळत आहे. हा कार्यक्रम मराठी, बंगाली, तमीळ अशा अनेक भाषांमध्ये असून तमीळमधील बिग बॉस तर चांगलाच प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हासन करत आहे.
बिग बॉस तमीळ या कार्यक्रमाचा यंदाचा दुसरा सिझन असून या कार्यक्रमाच्या सेटवर नुकताच एक अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून या अपघाताची पोलिस चौकशी करत आहेत. बिग बॉस तमीळ या कार्यक्रमाचे चित्रीकरण चेन्नईमधील तेम्बरामबक्कम येथे सुरू आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर काही काम सुरू असताना एक कामगार दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. ही घटना शनिवारी सकाळी झाली. या कामगाराचे नाव गुणाशेकरण असून तो तामिळनाडू मधील अरियालूर गावात राहाणारा आहे. तो एसी मेकॅनिक असून तो काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला असे म्हटले जात आहे. बिग बॉस कार्यक्रमाच्या टीमच्या ही गोष्ट लक्षात आली असता त्यांनी लगेचच त्याला नजीकच्या रुग्णायलात दाखल केले. त्याला तिथे आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण काहीच तासात त्याचे निधन झाले. नजरतपेठ पोलिस स्थानकात या अपघाताविषयी केस दाखल करण्यात आली असून पोलिस चौकशी करत आहेत.
बिग बॉस तमीळ या कार्यक्रमाच्या सेटवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनच्या वेळी देखील एका २८ वर्षीय पल्मबरचे अपघाती निधन झाले होते.
बिग बॉस तमीळच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण देखील याच सेटवर झाले होते. केवळ चित्रीकरण सुरू व्हायच्या काही दिवस आधी सेटमध्ये काही बदल करण्यात आले होते. यंदाच्या सिझनमध्ये सेटवर जेल रूम देखील बांधण्यात आलेली आहे.