टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) गेल्या काही वर्षांपासूनच आजारांचाच सामना करत आहे. टीव्हीवर सीता च्या भूमिकेत गाजलेली ही अभिनेत्री दोन मुलींची आई आहे. देबिनाला असा आजार झाला आहे जो ऑपरेशन केल्यानंतरही काही वर्षांनी पुन्हा होतो. हा आजार तिची पाठच सोडत नसल्याचं तिने म्हटलं आहे. पहिल्या मुलीच्या जन्माआधी तिला या आजाराचं निदान झालं. आता तिला पुन्हा त्याच समस्येला सामोरं जावं लागणार आहे. देबिनाने तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये या आजाराविषयी माहिती दिली.
देबिना बॅनर्जी तिच्या युट्यूब व्लॉगवर दैनंदिन जीवनातील अपडेट्स देत असते. देबिनाला एंडोमेट्रियोसिस आजार झाला आहे जो यापूर्वी पहिल्या मुलीच्या जन्माआधी झाला होता. देबिना म्हणते, "मला काहीच करायची इच्छा होत नाहीए. एंडोमेट्रियोसिस असा आजार आहे जो कधीच तुमची पाठ सोडत नाही. यासाठी एक छोटं ऑपरेशन करण्याची गरज आहे, पण तरी हा आजार परत येतोच. मी कधीच गोळ्या औषधं घेत नाही. वेदना कमी करण्यासाठी गोळ्या घेणं मला आवडत नाही."
ती पुढे म्हणाली, "पिरियड्समध्ये त्रास होणं हे नॉर्मल नाही. मला हे माहित नव्हतं कारण मला कधीच पिरियड्समध्ये त्रास झाला नाही. जेव्हा मी इतर मुलींच्या त्रासाबद्दल ऐकायचे तेव्हा मला बरं वाटायचं की मला त्रास होत नाही. लियानाच्या जन्माच्या काही वर्षांआधी मला पिरियड्समध्ये त्रास व्हायला लागला. तेव्हा मला समजलं की मला एंडोमेट्रियोसिस आणि ए़डेनोमायोसिस चं निदान झालं आहे. हा गर्भाशयाचा आजार आहे."
"डॉक्टर म्हणाले की मला ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस आणि ए़डेनोमायोसिस आहे. गेल्या २-३ महिन्यांपासून तो त्रास पुन्हा सुरु झाला आहे. खूप तीव्र वेदना होत आहेत. मी घरी बसून आराम करत राहिले तर मला वेदना जास्त जाणवतील." असंही ती म्हणाली.
देबिना आणि गुरमीत चौधरी 2009 साली लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर १३ वर्षांनी एप्रिल 2022 मध्ये देबिनाने पहिल्या मुलीला लियानाला जन्म दिला. यानंतर त्याच वर्षी सातच महिन्यात देबिनाने दुसऱ्या मुलीला दिविशाला जन्म दिला. तिची दुसरी प्रेग्नंसी प्रिमॅच्युर होती.