८ नोव्हेंबर, १९३६ रोजी राजशेखर यांचा गडहिंग्लजमध्ये जन्म झाला. राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भूतकर. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता आणि नाटकांतून ते छोट्या छोट्या भूमिका करायचे. अभिनयाचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाले. वडिलांना नाटकांमध्ये काम करताना पाहून, आपणही अभिनेता बनायचे, असे त्यांनी ठरवले. १९५० साली गडहिंग्लजहून कोल्हापूरला ते निघाले. कोल्हापूरला आल्यावर नाना जोशी यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. आपणही केव्हातरी हा रंगमंच गाजवू, ही आस उराशी बाळगत, नाना जोशींच्या नाटकांमधून ते ‘प्राँप्टरची’ भूमिका बजावू लागले.
हे असेच काही वर्षे चालला आणि अखेर ‘गणपत पाटील’ दिग्दर्शित ‘ऐका हो ऐका’ या नाटकामधून राजशेखर यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले. ऐन विशीत असताना राजशेखरजी यांनी ६० वर्षांच्या म्हातार्याची व्यक्तिरेखा केली. राजशेखर यांचे कलागुण पाहून गणपत पाटील त्यांना भालजी पेंढारकरांकडे घेऊन गेले आणि हाच राजशेखर यांच्या जीवनाचा टर्निंग पॅाईंट ठरला. भालजी पेंढारकरांनी त्यांच्या ‘आकाश गंगा’ या चित्रपटात पोलिसाची भूमिका दिली. या चित्रपटामध्ये राजशेखरजी यांनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली. पुढे ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटांमधून ते खलनायक म्हणून पडद्यावर झळकले. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटामध्ये तब्बल पाच भूमिका त्यांनी केल्या. पण, राजशेखरजी यांना खलनायक म्हणून ओळख मिळवून दिली, ती भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘साधी माणसं’ या चित्रपटाने. राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते. भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला. आवाजातली जरब आणि नजरेतला करारीपणा यामुळे राजशेखर खलनायकाच्या भूमिकेत चांगलेच रुळले. या भूमिकांमुळे कित्येकदा त्यांना ग्रामीण भागातील महिलांकडून शिव्या खाव्या लागत हीच त्यांच्या अभिनयाची खरी पोचपावती ठरली.
राजशेखर घराण्याची तिसरी पिढी म्हणून स्वप्नील राजशेखर यांची कन्या कृष्णा राजशेखर हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत कृष्णा राजशेखर हिने महाराणी जानकीबाई यांची भूमिका साकारली आहे. कृष्णाने अभिनयाचे धडे गिरवले असून कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे शिवाय गाण्याची देखील तिला आवड आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही कृष्णाची पहिलीच टीव्ही मालिका आहे. या मालिकेअगोदर हिमालयाची सावली या नाटकात तिने कृष्णाबाईची भूमिका निभावली होती.